सावकारी जाचाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
पिंपरी चिंचवडमधल्या भोसरी मध्ये वडापावची गाडी चालवणाऱ्या महेश क्षीरसागर या ३५ वर्षीय तरुणानं सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली....! या घटनेनं सावकारी जाचाचा विळखा आता ग्रामीण भागापुरता नाही तर शहरापर्यंत आल्याचं स्पष्ट झालंय...
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधल्या भोसरी मध्ये वडापावची गाडी चालवणाऱ्या महेश क्षीरसागर या ३५ वर्षीय तरुणानं सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली....! या घटनेनं सावकारी जाचाचा विळखा आता ग्रामीण भागापुरता नाही तर शहरापर्यंत आल्याचं स्पष्ट झालंय...
मूळचे लातूरचे पण पिंपरी चिंचवडमधल्या भोसरीमध्ये राहणारे महेश क्षीरसागर यांनी सचिन पिसाळ या सावकाराकडून दोन वर्षांपूर्वी सत्तर हजार रुपये कर्जाऊ घेतले. त्या बदल्यात दोन वर्षांत महेश यांनी साडे सात लाख रुपये दिले. पण तरीही सचिन पिसाळ यानं आणखी तीन लाख रुपयांची महेश यांच्याकडे मागणी केली.
अखेर या जाचाला कंटाळून महेशनी जीवनयात्रा संपवली. त्यानंतर पोलिसांनी सावकार सचिन पिसाळला अटक केली. खासगी सावकारीची ही एक घटना उघड झाली असली तरी सुद्धा, शहरात खाजगी सावकारांचा धंदा जोरात सुरुच आहे. त्याला पोलिसांचा आशीर्वाद असल्याचा आरोप होतोय.
गरीबांचं शोषण करणारी खासगी सावकारी आणि दाम दुप्पट पैशांचं आमिष दाखवून सामान्यांची दिशाभूल करणाऱ्या चिटफंड कंपन्यांवर कडक कारवाईची मागणी केली जातेय.
शहर असो वा ग्रामीण भाग सावकारीचा पाश आता अनेकांच्या गळ्याभोवती अडकू लागलाय. त्यावर लगाम कधी लागणार हाच खरा प्रश्न आहे.