नाशिक : मराठा आरक्षणासाठी आज नाशिकमध्ये मराठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मराठे मोर्चे हे कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, असे सांगत कोपर्डी प्रकरणातील आरोपींना भर चौकात गोळ्या घाला, असा संताप व्यक्त केला. त्याचवेळी मराठा आरक्षण हिसकावून घेवू, असा इशारा देताना सत्ताधाऱ्यांचा पराभव करा, असे आवाहन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपर्डीतील घटना ही छत्रपती शिवाजींच्या स्वराज्याला काळीमा आहे. यातील आरोपींना जाहीर फाशी द्या. अशा नराधमांना जनतेसमोर भर चौकात गोळ्या घालायला हव्या, असा संताप व्यक्त केला. 
 
अनेक लाजीरवाण्या घटना घडत आहेत. मात्र, पिडितांना त्वरित न्याय मिळत नाही. त्यामुळे लोकांचा सरकार,  पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. सामाजिक समतोल टिकायचा असेल तर कायद्यात बदल करा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.


मराठा ही जात नाही जीवन जगण्याची संस्कृती आहे. स्पर्धेच्या युगात फक्त मेरीट हाच निकष हवा. मराठा सोडून सर्वांना आरक्षण देतात. कोणीही कुठल्याही जातीचा असो, आर्थिकदृष्टया गरीब असेल त्याला आरक्षण हवे. स्पर्धेच्या युगात आरक्षणामुळे प्रगती खुंटली आहे, असे उदयनराजे म्हणालेत.


दरम्यान, इशारा देताना त्यांनी म्हटले जर आरक्षण मिळाले नाही तर ते आम्ही हिसकावून घेवू. मराठ्यांनी मूक मोर्चे काढले आहेत. परिस्थिति बिघडली तर उद्रेक होईल. लीबिया, सीरिया यांच्यासारखी परिस्थिति होऊ देऊ नका, असा इशारा दिला.