मॅरेथॉन चॅम्पियन ज्योती गवतेचं परभणीत जोरदार स्वागत
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनचं विजेतेपद परभणीच्या ज्योती गवते हिनं पटकावलंय. 42 किमी अंतर तिनं 2 तास 50 मिनिटं 52 सेकंदात पार केलंय. दुसऱ्यांदा तिने ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलाय.
गजानन देशमुख, परभणी : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनचं विजेतेपद परभणीच्या ज्योती गवते हिनं पटकावलंय. 42 किमी अंतर तिनं 2 तास 50 मिनिटं 52 सेकंदात पार केलंय. दुसऱ्यांदा तिने ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलाय.
रेल्वे स्टेशनवर जल्लोषात होणार स्वागत... वाजत गाजत निघालेली मिरवणूक... सर्वत्र आनंदी आनंद... हे सगळं दृश्यं परभणीत दिसतंय... त्याला कारणही तसंच आहे. परभणी कन्या ज्योती गवते हिनं दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाची समजली जाणारी मुंबई मॅरेथॉन जिंकण्याचा पराक्रम केलाय. लेकीच्या या यशामुळे आईवडिलांचा ऊरही अभिमानानं भरुन आलाय.
अॅथलेटिक्स हेच ज्योतीसाठी सर्वस्व आहे. त्यामुळेच 2003 पासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सकाळ-संध्याकाळ ती धावण्याचा सराव करते. तिच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलं-मुली पोलीस खात्यात नोकरीला लागलेत. धावण्याचा सराव करण्याची मुभा मिळत नसल्याने तिनं पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सोडली आणि अॅथलेटिक्ससाठी स्वतःला वाहून घेतलं. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक कमावण्याचं तिचं स्वप्न आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव उंचावण्याचा निर्धार तिनं केलाय. हे पदक जिंकून अवकाशाला गवसणी घालण्याचं ज्योतीचं स्वप्न साकार व्हावं यासाठी तिला शुभेच्छा...