मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा
मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.
मुंबई : मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाचा कहर
दरम्यान, लातूर जिल्ह्यात पावसाचा कहर माजला. सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालीय. मांजरा, तेरणा, तावरजा, घरणी या नदीकाठच्या हजारो हेक्टर क्षेत्रात पाणीच पाणी झालंय. तिरू मध्यम प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
बीड जिल्ह्यात नद्यांना पूर
बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळं नद्यांना पूर आलाय. पावसामुळे काही गावांचा संपर्कही तुटलाय. उमरी पारगावमध्येही पाणी आल्याने गावात 500 नागरिक अडकलेत. सरस्वती नदीलाही पूर आलाय. गेवराई तालुक्यातल्या चोपड्याची वाडी, राजापूर गावात पाणी शिरलंय.
उस्मानाबादमध्ये जनजीवन विस्कळीत
उस्मानाबादमध्ये पावसानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला पूर आलाय. या पुरामुळे वाशी ते फाकराबाद दरम्यानचा पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून फाकराबादचा संपर्क तुटला आहे.
जळगावात पावसाचा कहर
जळगावमध्येही पावसाचा कहर सुरुच आहे. चाळीसगाव तालुक्यात उपखेड शिवारात झालेल्या जोरदार पावसाने पूरस्थिती निर्माण झालीये. साकुर धरणातून आलेल्या पुराच्या प्रवाहात शेवानगर तांडा येथील एक शेतकरी वाहून गेलाय.. या पूरानं शेतीचं ही मोठं नुकसान झालंय. दरम्यान अंगावर वीज कोसळून वडगाव आणि जामनेर इथं दोघांचा मृत्यू झाला.
जालन्यात सर्वदूर पाऊस
जालना जिल्ह्यावरही वरुणराजा मेहेरबान झाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. काल रात्री उशिरा जालना जिल्ह्यातही जोरदार पावसाला सुरुवात झाली. जिह्यातील आठही तालुक्यात विजेच्या कडकडाटासह धुव्वाधार पाऊस पडत आहे. जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, भोकरदन, परतूर, मंठा, जाफराबाद तालुक्यात पावसानं हजेरी लावल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. रात्रभर पाऊस झाल्यानं ओढ्या नाल्यांना देखील पूर आला आहे.