गोष्ट एका आदर्श लग्नाची
ना लग्नपत्रिका ना बँडबाजा.. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव पंचायत समितीचे युवा उपसभापती यांनी अगदी साधेपणानं लग्न केलं आणि वाचवलेला सारा पैसा आत्महत्याग्रस्त आणि गरजू शेतकरी कुटुंबांना दिला.
बुलडाणा : ना लग्नपत्रिका ना बँडबाजा.. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव पंचायत समितीचे युवा उपसभापती यांनी अगदी साधेपणानं लग्न केलं आणि वाचवलेला सारा पैसा आत्महत्याग्रस्त आणि गरजू शेतकरी कुटुंबांना दिला.
राजकारण्याच लग्न म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात भारी भारी लग्न पत्रिका, भव्यदिव्य लग्न मंडप, रोषणाई, बँडबाजा. राज्यामध्ये एकीकडे सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अडचणीत सापडलेला असून विविध विवंचनेने तो आत्महत्या करत आहे. दुसरीकडे हे असंवेदनशील राजकारणी मात्र आपल्या मुलामुलींच्या लग्नात लाखो रुपये अनाठाई खर्च करतांना दिसून येतात.
मात्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समितीचे युवा उपसभापती चैतन्य पाटील याला अपवाद ठरलेत. बोरीअडगावच्या या युवकानं अगदी साधेपणात आपला लग्नसोहळा उरकला आणि वाचवलेला सारा पैसा त्यांनी खामगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, अनाथ मुल तसेच गरजू शेतकरी अशा २१ जणांना प्रत्येकी ११ हजार रुपये असा देऊन टाकला. या औदार्यामुळे एका शेतक-याला मुलीच्या लग्नासाठी मोठा हातभार मिळालाय..
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबाच्या व्यथा झी 24 तासनं दुष्काळावर मात कुटुंबाला साथ या कार्यक्रमातून मांडल्या होत्या. या कार्यक्रमातूनच आपल्याला ही प्रेरणा मिळाल्याचं चैतन्य सांगतात. इतर युवकांनी आणि राजकारण्यांनी अशाच प्रकारे लग्न करून शेतकऱ्यांना मदत करावी असं आवाहन चैतन्य पाटील यांनी केलय. चैतन्यचा विवाह आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असं युवकांनीही म्हटलय. एकूणच चैतन्य पाटील यांचा आदर्श इतरही राजकीय मंडळीनी घेतल्यास बीड येथील युवती प्रमाणे इतर शेतकऱ्यांच्या मुलींना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.