मेडिकलचा जुन्या नोटा, चेक स्वीकारण्यास नकार
पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्यानंतर रुग्णालय आणि मेडिकल सुविधेची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांना मात्र त्याचा चांगलाच फटका बसताना दिसतोय.
शुभांगी पालवे, शिर्डी : पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्यानंतर रुग्णालय आणि मेडिकल सुविधेची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांना मात्र त्याचा चांगलाच फटका बसताना दिसतोय.
चेक स्वीकारण्यास मेडिकलचा नकार
शिर्डीच्या साईनाथ हॉस्पीटल शेजारीच 'श्री मेडिकल'सहीत इतर काही मेडिकलमध्ये पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात येतोय. शिवाय, औषधं विकत घेण्यासाठी या मेडिकलमध्ये चेक स्वीकारण्यासही नकार देण्यात आला. कार्ड पेमेंटची सुविधा इथं उपलब्ध नाही... अशा वेळी ग्रामीण भागातून आलेल्या लोकांनी किंवा इथं बाहेरून भेट देण्यासाठी म्हणून आलेल्या पण, मेडिकलची गरज निर्माण झालेल्या लोकांनी औषधं विकत तरी कशी घ्यायची असा प्रश्न निर्माण झालाय.
'मेडिकलला कुठलेही आदेश मिळालेले नाहीत'
याबाबत, मेडिकलशी संपर्क साधला असता मेडिकलला पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे कुठलेही आदेश मिळालेले नाहीत असं उत्तर देण्यात आलं. पक्कं बिल देऊन पाचशेच्या नोटा स्वीकारण्यात याव्यात, अशी विनंती केल्यानंतरही मर्यादेच्या पलिकडे आम्ही बिल देऊ शकत नाही असं उत्तर मिळालं.
लायसन्स धारकाचं 'ऑनलाईन' अकाऊंट?
आपल्याकडे ऑनलाईन पेमेंटचा पर्याय उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं. यासाठी उद्य सुदाम देशमुख या नावावर अॅक्सिस बँकेत असलेल्या अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर करता येऊ शकतील असं सांगण्यात आलं. पण, हे अकाऊंट मेडिकल लायसन्स धारकाचंच आहे का? यावरही प्रश्नचिन्ह आहे.
मेडिकलची तक्रार कुठे नोंदवणार?
दरम्यान, मेडिकल साहाय्य न मिळाल्यानं सरकारनं जाहीर केलेल्या १०८ या क्रमांकावर तक्रार नोंदवण्यासाठी 'झी २४ तास'नं संपर्क साधला. यावेळी, आम्हाला केवळ खाजगी रुग्णालयांनी चेक स्वीकारले नाहीत तर तक्रार नोंदविता येईल... मेडिकल संदर्भात आमच्याकडे अद्याप कुठलेही आदेश आलेले नाहीत, असं उत्तर देण्यात आलं.
रुग्ण, नातेवाईक हतबल
सरकारच्या नोटा आणि चेक स्वीकारण्याच्या आदेशानंतर सरकारी आणि खाजगी रुग्णालयात जरी मदत मिळत असली तरी मेडिकलमधून औषधं उपलब्ध न झाल्यानं रुग्ण आणि नातेवाईक हतबल झालेत.