पुणे : मेपल ग्रुपची ५ लाखातली घर योजना ही सरकारी योजना नाही तसंच या योजनेसंदर्भातलं बुकींग बंद करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आले आहेत. ज्यांनी ज्यांनी यात पैसे भरलेत त्यांना ते पैसे परत करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. तसंच कंपनीच्या सर्व जमीन व्यवहारांबाबत कंपनीला नोटीसा देण्यात येणार असल्याचं पालकमंत्री गिरीष बापट यांनी झी २४ तासच्या एका कार्यक्रमात सांगितलं आहे. दरम्यान मेपल ग्रुपविरोधात शिवाजीनगर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंत्र्यांचे फोटो छापण्यात आले होते. मात्र सचिन अग्रवाल यांना आपण ओळखतच नाही असं गिरीष बापट यांनी म्हटलंय. दरम्यान फोटो छापण्यामागे भाजपचेच काही नेते असल्याची माहितीही समोर येतेय. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका माजी अध्यक्षाने यात पुढाकार घेतला होता. अशी माहिती उघड झालीय. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचं आश्वासन देखील या नेत्याने दिलं होतं.


फोटो छापण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही असं मेपल ग्रुपचे सचिन अग्रवाल यांनी पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. मात्र, त्यांनी पुण्यातील भाजपच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून फोटो छापल्याची माहिती पुढं येत आहे. तसंच बिल्डर अग्रवालचे भाजपचे नगरसेवक बिडकर यांच्यासोब संबंध असल्याचा नवा खुलासा झालाय. बिडकरांच्या कंपनीत अग्रवाल हा संचालक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नेते आणि बिल्डर दोघे मिळून लोकांची फसवणूक करतायंत की काय असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होतोय.