राज्यातील पावसाचे आगमन अजून लांबणीवर
मान्सूनचं डोळ्यात तेल घालून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना थोडंस निराश करणारी ही बातमी आहे.
पुणे : मान्सूनचं डोळ्यात तेल घालून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना थोडंस निराश करणारी ही बातमी आहे. कारण मान्सून आणखी दोन-तीन दिवसाने राज्यात दाखल होणार आहे.
मान्सून एक्स्प्रेस थबकली
कारण नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या प्रवेशद्वारापाशी थबकला आहे. केरळमध्ये येताच वेगाने कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या विविध भागांत आगेकूच करणाऱ्या मान्सून एक्स्प्रेसला ब्रेक लागले आहेत.
दोन-तीन दिवसात स्थिती बदलू शकते
हीच स्थिती आगामी दोन-तीन दिवस टिकून राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील पावसाचे आगमन अजून लांबणीवर.
दोन-तीन दिवस उशीर होणार
आयएमडीच्या संचालक डॉ. सुनीतादेवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची उत्तरसीमा शनिवारी सायंकाळपर्यंत कारवार, गदग परिसरात होती. तेथून मान्सून पुढे सरकलेला नाही. राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी अद्याप दोन-तीन दिवस लागतील.
ऊन-सावलीमुळे दिलासा
दरम्यान, शनिवारी मुंबई, ठाणे, कोकणासह घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी पाऊस पडला. राज्याच्या अनेक भागांत विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ हवामानामुळे तापमानाचा पारा उतरला. त्यामुळे सातत्याने ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाचा सामना करणाऱ्या विदर्भवासीयांना दिलासा मिळाला आहे.
आगामी तीन दिवस बंगालच्या उपसागराच्या मध्य आणि उत्तर भागात तसेच ईशान्येकडील राज्यांत तो बरसण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.