मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या वाढत्या अपघातां संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. एक्स्प्रेस वेवर रविवारी झालेल्या भीषण अपघातात, १७ जणांचा बळी गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, एक्स्प्रेस वेवर सतत अपघात होतच आहेत. त्यामुळे सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्री अपघातामागची कारणं जाणून घेणार आहेत. तसंच भविष्यात अपघात टाळण्याकरता करायच्या उपायांवरही यावेळी चर्चा होणार आहे.


मृत्यूचा महामार्ग... 


गेल्या काही वर्षांत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मृत्यूचा महामार्ग  बनलाय... पनवेलजवळ रविवारी पहाटे झालेल्या अपघाताप्रकरणी पोलिसांनी निखिल ट्रॅव्हल्सच्या बसचा मृत्यू पावलेला चालक इक्बाल शेख विरोधात गुन्हा दाखल केलाय. इक्बाल शेख बेदरकारपणे बस चालवत होता, असं साताऱ्याहून परतणाऱ्या प्रवाशांनीही सांगितलं. पण या अपघाताला तो एकटाच जबाबदार होता का? मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या या भरधाव बसनं पंक्चर झालेल्या स्विफ्ट कारला आणि डाव्या बाजूला उभ्या असलेल्या इनोव्हाला धडक दिली.


चालकांची रस्त्यावरची बेशिस्त


मुळात पंक्चर स्विफ्ट कार एक्स्प्रेस वेच्या पहिल्या लेनमध्ये थांबवून पंक्चर काढण्याचं कारण काय? पंक्चर काढत असताना पार्किंग लाइट्स का सुरू नव्हते? असे सवाल आता केले जातायत. बस चालकाचं बेदरकार ड्रायव्हिंग आणि कार चालकांची रस्त्यावरील बेशिस्त यामुळंच हा अपघात घडल्याचं बोललं जातंय.


अपघात रोखणार कसे?


गेल्या काही वर्षांत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा मृत्यूचा महामार्ग बनलाय. दरडी कोसळून होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनानं उपाय आखलेत. मात्र लेन कटिंग, वेगाची स्पर्धा आणि वाहनचालकांच्या डुलक्या यामुळं होणारे अपघात कसे रोखायचे, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.


- 2015 या वर्षात देशभरात 5 लाख अपघात झाले.


- त्यामध्ये 1 लाख 46 हजार लोकांचा मृत्यू झाला.


- महाराष्ट्रात सुमारे 63 हजार अपघात झाले.


- त्यामध्ये 13 हजार 212 लोकांचे बळी गेले.


- महाराष्ट्रात तब्बल 2 कोटी 56 लाख वाहनं आहेत.


- यापैकी लाखातल्या 249 वाहनांना अपघात झाल्याचं आकडेवारी सांगतेय...


कायद्यात सुधारणा... 


वाढत्या अपघातांची ही मालिका रोखण्यासाठी लवकरच मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाईची तरतूद त्यात करण्यात आलीय. याबाबतचं विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. या नव्या कायद्यामुळं तरी बेपर्वा वाहन चालकांना शिस्त लागेल का? आणि अपघातांची ही मालिका खंडित होईल का?