विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : नागार्जून अंकुला... दोन्ही पायांनी पोलिओग्रस्त... संपूर्ण जीवनभर कधी रांगत तर कधी काठ्याच्या मदतीनं चालणं नशिबी... अशा प्रचंड संकटमय आणि प्रतिकूल परिस्थितीत कुणीही हार मानेल... मात्र, औरंगाबादच्या 30 वर्षीय नागार्जुन अंकुला या जिगरबाज तरूणानं परिस्थितीला हरवत ती बदललीय. दोन्ही पायांनी अपंग असून, नागार्जुननं कधीच हार मानली नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागार्जून महापारेषण कंपनीत क्लास वन अधिकारी आहे... पट्टीचा पोहणारादेखील... नुकतंच चार्टड अकाउंटटच्या परीक्षेतही त्यानं यश मिळवलंय. मात्र हे सगळं साध्य करणं नागार्जूनसाठी सोपी गोष्ट नव्हती... नागार्जूनला पोलिओ आहे. लहान असतानाच त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. आंध्रातील अत्यंत लहान खेड्यात तो रहायचा... जन्मानंतर त्याला उपचार मिळू न शकल्यानं त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. गावातील लोक त्याला 'अभिशाप' म्हणायला लागले... पण त्याचे आई-वडील खचले नाही... त्यांनी नागार्जूनला घेत औरंगाबाद गाठलं आणि याठिकाणी सुरू झाला नागार्जूनचा खडतर प्रवास... 


नागार्जून पायानं अपंग होता पण डोक्यानं नाही... हे नागार्जूनला त्याच्या लष्करात काम करणाऱ्या वडिलांनी सांगितलं आणि तो अभ्यासाला लागला... कधीच खचायचं नाही, हार मानायची नाही, हे डोक्यात ठेवूनच त्यानं शिक्षण सुरु केलं आणि शिक्षणात दैदीप्यमान यश मिळवलं. सोबतच काही हितचिंतकाच्या मदतीनं पोहण्याची गोडी लागली आणि दोन्ही क्षेत्रात नागार्जून खडतर मेहनतीनं पुढं आला. 
 
आज नागार्जून एका मोठ्या हुद्द्यावर नोकरी करतोच आहे, सोबतच त्यानं राज्य पातळीवर पोहण्याच्या स्पर्धेत 15 सुवर्ण, 18 रौप्य आणि 20 कांस्य पदकं जिंकलीयत. नॅशनल स्पर्धैत सहभागी होण्यासही त्यानं आता सुरुवात केलीय. दोन वर्षांपूर्वी नागार्जूननं लग्न केलंय. त्याच्या सारख्याच दिव्यांगाला त्यानं आधार दिलाय. आता त्याच्या संसारवेलीवर काव्यारूपी सुंदर फुलही उगवलंय. अशा नव-याचा अभिमान असल्याचं त्याची पत्नी संगीता अंकुला म्हणतात. 
 
म्हणतात ना जिद्द आणि चिकाटी असली तर काहीच अशक्य नाही, याचंच नागार्जून मूर्तीमंत उदाहरण आहे. लहानपणी अभिशाप ठरलेला नागार्जून आता वरदान ठरलाय. आई वडिलांच्या कष्टांच त्यानं चीज केलंय. नागार्जूनच्या या जिद्दीसाठी त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.