नाशिकमध्ये राजकीय खिचडीची खमंग चर्चा...
नाशिक महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी.. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेनं काही प्रभागात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरुय.
मुकुल कुलकर्णी, झी मीडिया नाशिक : नाशिक महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी.. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेनं काही प्रभागात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरुय.
या घोषणा ऐकायला थोड्या वेगळ्या वाटत असल्या तरी अशा गगनभेदी घोषणांनी सध्या नाशिक शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जाणारा रविवार कारंजा परिसर दणाणून गेलाय.
महापालिकेच्या प्रभाग १३ मध्ये मोडणाऱ्या या परिसरातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गजानन शेलार, मनसेच्या विद्यमान नगरसेविका सुरेखा भोसले, आणि कॉंग्रेसचे नगरसेवक वत्सला खैरे आणि शाहू खैरे यांनी पक्षीय भिंती मोडून पॅनलची निर्मिती केलीय. मनसेनं शहरात केलेल्या राजकीय खिचडीची सर्वत्र चर्चा सर्वत्र सुरुय. पंचवटीतील प्रभाग क्रमांक ५ पाच मध्येही मनसेच्या दोन उमेदवारांचं इंजिन दोघा अपक्ष उमेदवारांच्या शिट्टी आणि गँस सिलेंडरबरोबर धावतंय. तर महापौरांसमोरही कॉंग्रेस राष्ट्रवादीचे आव्हान उरलेले नाही.
राजाला साथ द्या असं गाणं गात मनसेनं भावनिक साद घातलीय. कारण मनसेच्या नाशिकच्या गडावरचे २६- २७ शिलेदार त्यांच्या राजाला सोडून निघून गेलेत. महापालिकेच्या 122 जागाही मनसे लढवू शकत नाहीये. मनसे या महाआघाडीला खिचडी मानत नाही, काँग्रेसला ही अपरिहार्यता आहे असं वाटतंय. तर अपक्ष गुरमीत बग्गा लोकांची अपेक्षा पूर्ण करत असल्याचं सांगतात.
लोकसभा निवडणुकीत मनसेनं “एकाची भीती म्हणून केली महायुती” असा प्रचार राज्यभर करून शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली होती. ज्या कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज ठाकरे वारंवार वाभाडे काढायचे. त्यांच्याशीच आज मनसेला महाआघाडी करण्याची वेळ आलीय.