मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात मंगळवारी मध्यरात्री टोळक्याने लाठ्या-काठ्या धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवीत १५ ते २० गाड्यांची तोडफोड केली. एक दीड तास गुंडांचा धुडगूस सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकची गुन्हेगाराची आकडेवारी पाहता सध्या या शहराला राज्याची 'क्राईम कॅपिटल' म्हणायला हरकत नसावी... ही भयानक दृष्य आहेत पंचवटीतील पाथरवट लेन, गजानन चौक, प्रतापसिंह चौक परिसरातली. २० ते २५ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्र, काठ्या घेऊन धुमाकूळ घातला. समोर जी गाडी दिसेल ती गाडी हे टोळकं फोडत चाललं होतं. दंगा नियंत्रण पथक शिघ्र कृती दलासह पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी पोहोचल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.  


मागच्या भांडणाची कुरापत काढण्यासाठी कोणाच्या तरी शोधात गावगुंडांचं हे टोळकं पाथरवट लेनमध्ये आलं. त्यांच्या आपापसातल्या वादात नाहक परिसरातल्या नागरिकांचं नुकसान झालं. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी काही काळ ठिय्या आंदोलन केलं. अखेर पोलिसांनी चार ते पाच जणांना अटक केली.  


मागच्या आठवड्यात गोदापार्कवर सकाळच्या वेळी दोघा गावगुंडांनी खेळाडूंची छेड काढत प्रशिक्षकावर जीवघेणा हल्ला केला होता. ते प्रकरण शांत होत नाही तोच आता २० ते २५ गावगुंडांनी नाशिकमध्ये धुमाकूळ घातला. नाशिकच्या पोलिसांनी याआधीच पोलीस महासंचालकांनी वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचं अल्टीमेटम दिलं होतं. मात्र नाशिकचे पोलीस ते अल्टीमेटम विसरलेले दिसतात. नाशिक पोलिसांवरच गावगुंड भारी ठरत असल्याची ही उदाहरण निश्चितच पोलिसांची कामगिरी काय दर्जाची आहे ते सांगून जातात.