मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : स्मार्ट सिटी अभियानात टिकून राहण्यासाठी महापालिकेत सत्ताधारी भाजपने मनसेच्या काळातली कामं दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेतलीय. मात्र नियोजनाअभावी मनसेच्या काळातले हे प्रकल्प आता बंद पडायला सुरूवात झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७ डिसेंबर २०१६...ऐन निवडणुकीच्या काळात मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या नाशिकच्या बोटॅनिकल गार्डनच्या लेझर शोचं आजचं हे भीषण चित्र. गार्डनच्या प्रवेशद्वारापाशीच लावण्यात आलेला प्रवेश बंद हा फलक नाशिक शहरात चर्चेचा विषय झालाय. लेझर शो अनिश्चित काळासाठी बंद झालाय. त्यामुळे नाशिककरांची आणि पर्यटकांची निराशा झालीय. खुद्द राज ठाकरे, अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या लेझर शोवर अवघ्या तीन ते चार महिन्यात अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याची पाळी आली. 


मनसेने पाचवर्षांच्या सत्ताकाळात शहरात इतिहास संग्रहालय, चिल्ड्रन्स ट्रॅफीक पार्क, आकर्षक वाहतूक बेटं साकारली. या प्रकल्पाचं भाजपने स्मार्ट सिटी अभियानात सादरीकरण करून स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी आता हे प्रकल्प बंद पडायला लागलेत. त्याची दखलही घेतली जात नाहीये. मनपाने तातडीने लेझर शो सुस्थितीत चालू करावा नाही तर मनसे त्याचं पालकत्व स्वीकारायला तयार असल्याची भूमिका मनसेनं घेतलीय. 


याआधीच शहरातली वाहतूक बेटं हटवून तिथे सिग्नल बसवण्याचा घाट घातला जातोय. मनसेचे विकास प्रकल्प जास्त काळ लोकांच्या डोळ्यांसमोर राहू नयेत असा घाट घातला जातोय. त्यामुळे येत्या काळात विकास कामांवरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.