`कौमार्य चाचणी` झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.
अहमदनगर : जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय. पण, इतकं सहन केल्यानंतर या मुलीचा निर्णय काय असेल? असा प्रश्नही अनेकांना पडलाय.
तिला कौमार्य परीक्षेत मुलगी 'नापास'
ती विशीतली तरूणी... पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असलेली... गेल्या २२ मेला तिचं लग्न झालं. नवऱ्यामुलाचं आधीच लग्न झालेलं असतानाही तिनं त्याला स्वीकारलं... अखेर ती वेळ आली... कौमार्य परीक्षेची... जातपंचायतीतल्या भुतांच्या दबावामुळं तिची कौमार्य चाचणी घेण्यात आली. आणि दुर्दैव म्हणजे त्यात तिला चक्क नापास ठरवण्यात आलं. पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमुळं असं घडल्याचं तिनं जीव तोडून सांगितलं. पण पंचांनी झालेलं लग्न मोडलं... नवऱ्याकडची मंडळी निघून गेली, पण जाताना मुलीच्या अंगावरचे सगळे दागिने न्यायला ते विसरले नाहीत... अगदी मंगळसूत्रही...
जातपंचायतीचं भूत
जातपंचायतीचं भूत अजूनही मानगुटीवर कसं बसलंय, हे दाखवणारी नगरमधली ही घटना... सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे आणि अॅड. रंजना गवांदे यांनी हे प्रकरण उजेडात आणलं.
चौकशी होणार...
कौमार्य परीक्षेचा हा संतापजनक प्रकार मीडियानं चव्हाट्यावर आणल्यानंतर, महिला आयोग आणि सरकारनं चौकशीचे आदेश दिलेत, असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.
असं काही घडलंच नाही...
दरम्यान, कौमार्य परीक्षेसारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा आता जातपंचायत सदस्य करतायत... इतकंच नाही तर त्या तरूणीला आता परत घरी आणण्याची तयारी तिच्या नवऱ्यानं दाखवलीय.
त्या तरूणीला मीडियाच्या दबावामुळं सासरच्यांनी स्वीकारण्याचं ठरवलंय... पण कौमार्य परीक्षेसारख्या जाचक परंपरा अजूनही समाजात सुरू असाव्यात, याला काय म्हणायचं? महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रथांना मूठमाती कधी मिळणार?