पुणे  : वादग्रस्त जागांचा तिढा न सुटल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अखेर आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. याबाबतची अधिकृत घोषणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापैकी कुणाकडूनच झाली नाही. मात्र दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय एकमेकांना कळवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार नाही हे स्पष्ट झाल्यावर आघाडी व्हावी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी व्हावी यासाठी दोन्ही पक्षांचे नेते आग्रही होते. खरंतर याआधी पुणे महापालिकेसाठी हे दोन्ही पक्ष कधीच एकत्र लढले नव्हते. मात्र यावेळी पहिल्यांदाच आघाडीसाठी चर्चा सुरू होती. अजित पवार आघाडीसाठी विशेष आग्रही होते. त्याचप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही आग्रही होते. त्यामुळे 2 आठवडे चर्चाही झाली. चर्चेच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीकडून काँग्रेसला १६२ पैकी ६० जागा सोडण्याची तयारी दर्शवण्यात अली होती. मात्र कोणी किती जागा लढवायच्या यापेक्षा कोणी कुठल्या जागा लढवायच्या यावरून तिढा निर्माण झाला होता. विशिष्ट जागांवर दोन्ही पक्षांनी दावा सांगितला होता. त्यामुळे हा विषय मुंबईपर्यंत गेला. मात्र तिथेही त्यावर तोडगा निघू शकला नाही. 


कशामुळे फिसकटली आघाडी


मॉडेल कॉलनी प्रभागासाठी दोन्ही काँग्रेस आग्रही होती
वाकडेवाडी प्रभागाची जागा दोन्ही काँग्रेसना हवी होती
वानवडी प्रभागात राष्ट्रवादीला हव्या होत्या 3 जागा, काँग्रेस 2 जागांसाठी आग्रही होती
सहकार नगर प्रभागात काँग्रेसला 2 जागा हव्या होत्या, राष्ट्रवादीची 3 जागांची मागणी होती.


या जागांवर तोडगा न निघाल्याने अखेर दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. अशीच स्थिती पिंपरी चिंचवड महापालिकेतही झालीय. आघाडीबाबत दोन्ही पक्षांच्या चार बैठका झाल्या. काँग्रेसने राष्ट्रवादीकडे 30 जागांची मागणी केली. पण राष्ट्रवादी 20 जागा देण्यास तयार होती. राष्ट्रवादीने 20 जागा देऊन अपमानास्पद वागणूक दिल्याचं मत काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलंय. तर राष्ट्रवादीने आपल्या भूमिकेचं समर्थन केलंय.



त्यामुळे आता भाजप, सेने प्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीदेखील स्वबळावर लढणार आहेत. आता ते त्यांच्या उमेदवार याद्या कधी जाहीर करतात याबद्दल उत्सुकता आहे. किंबहुना यादी जाहीर करण्याऐवजी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाण्याचीही शक्यता आहे.