जयेश जगड, मीडिया, अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता 'मन की बात'ऐवजी पाकिस्तान विरोधात 'गन की बात' करावी, असा घणाघात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे शिवसेनेनं काढलेल्या 'रूमणे मोर्चा'त बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शिवसेनेने काढलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी 'रूमणे' घेवून आले होते. शिवसेना पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालयावर असे मोर्चे काढणार आहे. 


अकोला जिल्ह्यातील बाळापुरात आज शिवसेनेनं सरकार विरोधात एल्गार पुकारत आंदोलन केलंय. शेतकऱ्यांच्य विविध मागण्यांसाठी शिवसेनेनं आज बाळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 'रूमणे मोर्चा' काढला. दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झालीय. संपुर्ण कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोग लागू करा, बाजारात शेतमालाचे विक्री स्वातंत्र्य द्या, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, तूर खरेदीचा घोळ संपवा, पारस प्रकल्पातील २५० मेगावेटच्या संचाचे काम त्वरीत सुरू करा, अशा अनेक प्रमुख मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या.


यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने आता शेतकरी हिताच्या गोष्टी कराव्यात... पंतप्रधान मोदींनी आता 'मन की बात' ऐवजी पाकिस्तान विरोधात 'गन की बात' करावी, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी दिलाय. 


येणाऱ्या काळातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेनं आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना जनतेच्या प्रश्नांवर सरकारविरूद्ध आक्रमक होण्याचं आवाहन केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर सेनेच्या अकोल्यातील आजच्या रूमणे आंदोलनाला महत्त्व आहे.