ठाणे : काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप रत्नागिरीतल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यानं केलाय. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. दुसरीकडे संदीप सावंत मारहाण प्रकरणी नीलेश राणे यांच्यासह काहीजणांवर अपहरण करुन मारहाण करणे आणि दंगल माजवणे असे गुन्हे दाखल करण्यात आलेत.


सावंत यांना पोलीस संरक्षण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान संदीप सावंत यांच्यावर ठाण्यात उपचार सुरु आहेत. तिथं त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय. राणे यांच्यापासून आपल्याला धोका असल्याने आपण मुंबईत उपचार न घेता ठाणे येथे उपचार घेत असल्याचे संदीप सावंत यांनी म्हटलेय.


मी मारलेले नाही, हे भाजप-शिवसेनेचे षडयंत्र : राणे


रत्नागिरीतील मराठा आरक्षणाची पहिली सभा यशस्वी झाल्याने शिवसेना-भाजपवाल्यांना पोटशूळ झाला आहे. संदीप सावंत याने केलेले आरोप हे बिनबुडाचे असून हे राजकीय षडयंत्र आहे. संदीप सावंत याच्याशी हात मिळवणी करून हा विरोधकांनी रचलेला डाव आहे, असे म्हणत नीलेश राणे यांनी आरोप फेटाळलेत.


माझ्याकडे १० लाख रुपयांची मागणी 


संदीप सावंत याने माझ्याकडे घरबांधण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती आणि ते त्याला माझ्याकडून मिळाले नाही म्हणून त्याने विरोधकांच्या साथीने हा घाणेरडा डाव रचला आहे. मी घेतलेल्या मराठा सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि पुढेही मिळेल, अशी भीती सेना-भाजपवाल्यांना वाटू लागली आहे म्हणूनच हे राजकारण केले जात आहे. संदीप सावंतने सभेला जाऊ नका असे अनेकांना त्याने सांगितले. आजवर घरचा माणूस समजून मी संदीप सावंतला सर्वोतोपरी मदत केली. संदीपने केलेल्या आरोपांचे उत्तर मी त्याला कायदेशीर देईन. मागचे दीड ते दोन महिने तो सेना- भाजपवाल्यांच्या संपर्कात होता. त्यांचेच हे कारस्थान आहे, असे नीलेश राणे म्हणालेत.