संतोष लोखंडे, बुलढाणा : तुमच्या गावातील खातेदारांकडे कर्ज थकीत असेल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही, असा फतवा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सेंट्रल बँकेने काढला आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा करू इच्छिणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सततचा दुष्काळ, वेळीअवेळी पडणारा पाऊस यामुळे सततची नापिकी त्यामुळे शेती म्हणजे न परवडणारा व्यवसाय झाल्याने कर्जबाजारी होऊन अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या थांबाव्या म्हणून शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय सुरू करावे असे आवाहन शासनाच्यावतीने नेहमीच करण्यात  येते. त्यासाठी शासनाच्याकडून अनेक योजना देखील राबविण्यात येतात. परंतु बँकांकडून कशाप्रकारे शेतकऱ्यांची हेळसांड करण्यात येते याचं उदाहरण आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. 


भीमराव अंभोरे.... बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या कळंबेश्वरमध्ये शेती व्यवसाय करतात... त्यांच्याकडे 3 एकर जमीन आहे... मात्र, सततच्या नापिकीमुळे त्यांनी जनावरं घेण्यासाठी मागासवर्गियांसाठी असणा-या पशुपालन योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत अर्ज केला. तो मंजूर देखील झाला. पण आता बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. बँक अधिकाऱ्यांनी कळमेश्वर गावात अनेक खातेदारांकडे कर्ज थकीत असल्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही, असं लेखी पत्र अंभोरे यांना देऊन त्यांचं कर्ज प्रकरण नामंजूर केलं. 


वास्तविक पाहता भीमराव अंभोरे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे बँकेची कुठलीच थकबाकी नाही. तरीही अंभोरे यांचं कर्जाचा अर्ज नामंजूर केला गेला... त्यावरून बँक अधिकारी शेतकाऱ्यांप्रती किती संवेदनशील आहेत हेच यावरून दिसून येतं.


एकूणच सेंट्रल बँकेचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची एकप्रकारे चेष्टा असून बँकेने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.