धुळे : नागपूर-सुरत महामार्गावर भीषण अपघातानं 18 जणांचा बळी घेतला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मृतांच्या कुटुंबाची वाताहत झाली. पण या अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लागली का ? प्रशासनाचा धाक वाहन चालकांना आहे का? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न झी 24 तासनं केला... त्यात असं भयाण वास्तव समोर आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच दिवशी एकाच अपघातात 18 जणांना आपले प्राण गमवावे लागले असले तरी महामार्ग वाहतुकीला शिस्त म्हणून लागलेली नाही. एकमेकांच्या पुढे निघण्याच्या नादात महामार्गावर वाहन चालक सर्रास नियमांचं उल्लंघन करताना दिसून आले. नियम बाह्य वाहतुकीवर ज्या आरटीओनं निर्बंध घातले पाहिजे त्या विभागाचं महामार्गावर कुठंही अस्तित्व दिसून आलं नाही. 


नागपूर-सुरत महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याचं ठिकठिकाणी दिसून येतं. रस्त्याच्या मधोमध असे खड्डे पडलेत तर दोन्ही बाजूला रस्ता आणि जमिनीमध्ये अर्ध्या फुटांपेक्षा मोठा गॅप तयार झालाय. पुलाच्या बाजूला कठडे नाहीत. रस्ता सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहतूक सुरू असताना ना प्रशासकीय यंत्रणा ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतेय ना नागरिक सुरक्षित प्रवासाला महत्व देतायत.


जिल्ह्यात पोलीस यंत्रणा तरी या अवैध वाहतुकीविरोधात कारवाई करताना दिसते, आरटीओ विभाग तर फक्त सीमा तपासणी नाक्यांपुरता सीमित आहे. आरटीओ आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचा ढिम्म कारभार आणि नागरिकांची दुसऱ्याकडे बोट दाखविण्याची मानसिकता बदलली तरच रस्ते अपघात नियंत्रणात येतील.