उल्हासनगर : भाजपमध्ये डेरेदाखल झालेले ओमी कलानी यांनी थेट कायद्यालाच आव्हान दिल्याची घटना समोर आली आहे. निवडणुकीमुळे ठाणे जिल्हयात आचारसंहिता लागू आहे. दरम्यान काल संध्याकाळी उल्हासनगरमधल्या गोल मैदानात भाजप आणि मित्र पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या भर सभेत ओमी कलानी कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून हातात भली मोठी नंगी तलवार घेऊनच दाखल झाले. यामुळे एकच खळबळ उडाली. 


विशेष म्हणजे या सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असताना सुद्धा, ओमी कलानी यांना त्यांच्या या कृत्याबाबत कोणीही हटकलं नाही. त्यांची ही कृती म्हणजे आचारसंहितेचंही उल्लंघन ठरलं आहे. सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केलेल्या ओमी कलानी यांच्या या कृत्यावर, भाजप अजून गप्प कशी असा प्रश्न आता विचारला जात आहे.