नागपूर : तीन दिवसानंतर सुरू झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज गोंधळानं सुरूवात झालीय. सभागृहात आणि सभागृहाबाहेर दोन्हीकडे विरोधकांनी महादेव जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. तर कामकाज सुरू झाल्याबरोबर राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेत दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांचा राजीनामा घ्या अशी मागणी सरकारकडे केली. मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रीमंडळातल्या प्रत्येकच मंत्र्याला क्लीन चीट देतात. पण जानकारांच्याबाबतीत त्यांनी निवडणूक अधिका-यांवर दबाव टाकलाय.त्यामुळे अशा मंत्र्यांना पाठिशी घालणं योग्य नसल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलंय.


जानकरांना निवडणूक आयोगानं दोषी धरलेलं नाही, त्यामुळे कारवाईची गरज नाही असा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. यानंतर खडसेंवर आरोप झाला, त्यांचा काटा काढला, जानकरांवर तर गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल काँग्रेस आमदार विजय वड़्डेटीवार यांनी केला.  यानंतर विरोधक व्हेलमध्ये उतरले, आणि जानकारांच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी करू लागले. आणि तिथेच ठिय्या आंदोलनही सुरू केलं.