औरंगाबाद : मरावे परी अवयवरूपी उरावे याची प्रचिती औरंगाबादमध्ये आली. दुचाकीच्या अपघातात मृत्यू झालेले अनिल पाटील यांचं हृदय दोन्ही किडन्या आणि यकृत दान करण्यात आलं. यामुळे एका शेतकऱ्याला जीवदान मिळालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतक-याला शिक्षकाच्या हृदयाची साथ मिळाली आणि थांबलेलं शेतक-याचं हृदय पुन्हा धडधडू लागलं. ही किमया घडवली ती अनोख्या दातृत्वानं. शिक्षक असलेले अनिल पाटील दुचाकी अपघातात रस्त्यावर पडले आणि ब्रेन डेड झाले. दोन दिवस त्यांच्यावर उपचार होऊनही नशिबाची साथ मिळाली नाही. अखेर डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केलं. 


याच रुग्णालयात श्रीमंत थोरात नावाचा एक शेतकरी शेवटच्या घटका मोजत होता. या दोन्ही घटना एकाच दिवशी एकाच वेळी औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात घडत होत्या. त्यात ब्रेन डेड झालेल्या पाटील कुटुंबीयांना डॉक्टर्सनी अवयवदानाबाबत माहिती दिली. 


तुमच्या मदतीनं एक शेतकरी तर वाचेलच आणि आणखी तिघांना जीवनदान मिळेल असं त्यांनी पाटील कुटुंबीयांना सांगितलं. घरचा कर्ता पुरुष गेल्यानं पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तरीही त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आणि मराठवाड्यात इतिहास घड़ला. 


पहिल्यांदाच मराठवाड्यात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. शेतक-याला जीवदान मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान या कुटुंबीयांकडून रुग्णालयानं एकही पैसा न घेता शस्त्रक्रिया पार पाडली. 


रुग्णालयासाठी हे सगळं करणं मोठी गोष्ट होती. हा सर्व खर्च 30 लाखांवर होता. मात्र, माणुसकी महत्त्वाची असल्याचं इथल्या डॉक्टर्सनी सांगितले. 


जग सोडून गेलेले अनिल पाटील आज चौघांच्या आयुष्यात अवयवरूपी जिवंत आहेत हेच खर दातृत्व आहे. यातून गरज आहे ती इतरांनी प्रेरणा घेण्याची, अशी रुग्णालयात चर्चा सुरु होती.