आशिष अंबाडे, चंद्रपूर : अवयवदानाबाबत सरकारी पातळीवर मोठे प्रयत्न होत असताना जनमानसातही त्याचं महत्त्व पटू लागलंय. चंद्रपूरमधल्या कंचनवार कुटुंबांनं मुलीचे अवयव दान करुन त्याचाच प्रत्यय दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूरच्या सिव्हिल पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी पूजा कंचनवार १ एप्रिलला आपल्या मित्रांसोबत फिरायला गेली. अजयपूरच्या झोपला मारुतीच्या दर्शनाला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. 


या अपघातात पूजाच्या डोक्याला जबर मार लागला. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, पाच दिवसाच्या उपचारानंतरही तीच्या मेंदूने काहीच प्रतिसाद न दिल्यानं डॉक्टरांनी ब्रेन डेड झाल्याचं सांगितलं. 


पूजाच्या आई-वडीलांना हा धक्का सहन होण्यासारखा नव्हता. यावेळी प्राध्यापक बलराज गांधी यांनी त्यांना सावरलं आणि अवयवदानाची कल्पना पूजाच्या आई-वडिलांना सांगितली. पोटच्या गोळ्याच्या मृत्यूच्या कल्पनेनं धक्का बसलेल्या कंचनवार दाम्पत्याला सावरणं ही कठीण बाब होती. मात्र, गांधी यांनी पूजाच्या आई-वडिलांचं योग्य समुपदेशन केलं आणि कंचनवार यांनी मुलीच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. 


कंचनवार यांच्या निर्णयानंतर नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात पूजाचे लिव्हर, किडनी, डोळे आणि त्वचा दान करण्यात आली. कंचनवार यांच्या अवयवदानाच्या निर्णयाने एक नवा आदर्श घालून दिलाय, हे नक्की...