डोंबिवली : २६ मेचा दिवस डोंबिवलीकरांसाठी काळा दिवस ठरला. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की यात पाच जण ठार झाले तर दीडशेहून अधिक जण जखमी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संकटकाळात डोंबिवलीकर मात्र तत्परतेने धावून आला. अॅम्ब्युलन्स, अग्निशमन सेवा कार्यरत होतीच मात्र त्याचबरोबर घटनास्थळी उपस्थित लोकही मदतीचा हात पुढे करत होते. जखमींना तातडीने आर.आर. रुग्णालय, ममता, एम्स, चैतन्य येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात रक्ताची गरज भासत होतीच. 


एरव्ही केवळ जोक्स आणि संदेशाचा भडिमार सुरु असणाऱ्या व्हॉटसअॅपवरुन रक्तदान करण्यासाठीचे आवाहन करण्यात आले आणि लोकांनी या आवाहानाला मोठा प्रतिसाद दिला. फेसबुकवर एक फोटो पोस्ट करण्यात आलाय. ज्यात रक्तदान करण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसतेय. प्लाझमा ब्लड बँकेत रक्तदान करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले गेले. संकटकाळात एकमेकांना आधार देणाऱ्या माणुसकीचे दर्शन यावेळी डोंबिवलीत पाहायला मिळाले.