औरंगाबाद : एरव्ही पोलीस एकीकडे त्यांची गाडी असे चित्र सऱ्हास पाहायला मिळते. अनेक ठिकाणी पोलीस वेळेवर पोहोचत नाही, अशीही तक्रार असते. मात्र हाच कामचुकारपणा कमी करण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद पोलीस आता अधिक वेगवान होणार आहे. जीपीएसच्या माध्यमातून पोलिसांची गतिमानता पाहायला मिळणार आहे. औरंगाबाद शहरातल्या पोलिसांची पेट्रोलिंग करणारी सर्व वाहने आता जीपीएसच्या माध्यमातून आयुक्त कार्यालयासोबत जोडण्यात आली आहे. 


शहरात कुठली पोलीस गाडी कुठं आहे, गाडी सुरू आहे तर तिची गती काय आहे आणि जर ती एका जागेवर उभी आहे तर ती कितीवेळापासून याची माहिती कंट्रोल रूममध्ये उभारलेल्या यंत्रणेवर समजेल. शहरात कुठे गुन्हा घडला तर त्या घटनास्थळजवळ कुठलं वाहन उपलब्ध आहे याची माहिती पोलिसांना मिळेल. त्यावरून यंत्रणा सक्रीय करण्यात मदत होणार आहे. 


या यंत्रणेचा महत्वाचा फायदा म्हणजे कामचुकार पोलिसांवर वचक ठेवता येणारेय. त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल. पर्यायानं नागरिकांनाच याचा फायदा होणार आहे. सध्या फक्त चारचाकी वाहनांना ही यंत्रणा लावण्यात आलीय. मात्र या महिन्यात पोलिसांच्या गस्तीवर असणाऱ्या सर्व दुचाकींनाही अशी यंत्रणा लावण्यात येणार आहे. परिणामी पोलिसांची कार्यक्षमता तर वाढेलच सोबतच कामचुकारांवर अंकुश ठेवण्यासोबत कायदा सुव्यवस्थाही चोख राहण्यास मदत होईल.