मुंबई : जालना शहरातील भाग्यनगर वसाहतीत असलेले नगर पालिकेच्या मालकीचं आणि मुलांच्या खेळासाठी राखीव असलेलं मैदान राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ठिकाणी खोतकर यांनी स्वतःचे संपर्क कार्यालय थाटल्याचे त्या म्हणाल्यात. मेनन यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. मागील आठवडयातच प्रीती मेनन यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर जालना बाजार समितीतील गाळे घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी एसीबी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान रविवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत मेनन यांनी खोतकरांवर तोफ डागली आहे.


भाजप पदाधिकाऱ्याचा जमिनीवर डोळा


दरम्यान, सांगलीतील वालचंद कॉलेजच्या 110 एकर जमिनीवर सांगलीचे भाजप शहर अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा डोळा असल्याचा आरोपही प्रीती मेनन यांनी यावेळी केला.


24 मे 2016 रोजी देशमुख यांनी पुण्यात वालचंद कॉलेजच्या कार्यालयावर हल्ला करून ट्रस्ट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी देशमुख यांच्यावर कारवाई होऊन ते आता कारागृहामध्ये असायला हवे होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे देशमुख अजूनही मोकाट आहेत. वालचंद कॉलेजवर प्रशासक नेमण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यालयातून देशमुख यांना मदत केली जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
 
देशमुख हे आधी राष्ट्रवादीत होते, आता ते सांगलीचे भाजप शहर अध्यक्ष आहेत. भाजप हा राष्ट्रवादीच्या लोकांचा नवा मुखवटा आहे, अशी टीका यावेळी मेनन यांनी केली.