कोल्हापूर : प्राध्यापक कृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या प्रितम पाटील याला अटक करण्यात आलीय. त्याच्यासोबत त्याच्या आईलाही अटक करण्यात आलीय. तिच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरवले यांच्या मारेकर-यांना अटक करत नाही तोवर त्यांचं पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांचे कुटुंबीय आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी घेतली होती. आंबेडकरी चळवळीचे कोल्हापूरमधले ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक कृष्णा किरवले यांची शुक्रवारी दुपारी राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. 


सीबीआय चौकशी करा : रामदास आठवले


दरम्यान, कृष्णा किरवले यांच्या हत्येची सीबीआय चौकशीची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. कोल्हापूर येथे किरवले कुटुंबियांची भेट घेतवेळी त्यांनी ही मागणी केली. 


किरवले यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना आठवले  यांनी हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगाराला अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


प्राध्यापक कृष्णा किरवले हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. आठवले यांनी किरवले कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. 


कोल्हापुरात काल हत्या


आंबेडकरी विचारधारेचे अभ्यासक असलेल्या किरवले यांची काल हत्या झाली होती. या हत्येनंतर राज्यभरातून निषेध नोंदवला जात आहे. सुतारकाम व्यावसायिक असलेल्या व्यक्तीने किरकोळ कारणावरून किरवले यांची हत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार शाहुपुरी परिसरातून एका संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात आली होती.


शिवाजी विद्यापीठाजवळ असलेल्या किरवले यांच्या घरात त्यांच्यावर चाकून हल्ला करण्यात आला होता. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रमुख अशी पदे किरवले यांनी भूषवली होती. काही महिन्यांपूर्वीच ते विद्यापीठातून निवृत्त झाले होते.