पुणे मेट्रो भूमिपुजनाचा वाद पेटला, २३ डिसेंबरला पवारांच्या उपस्थित कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर पुणे महापालिकेच्यावतीने बहिष्कार टाकण्यात आलाय.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर पुणे महापालिकेच्यावतीने बहिष्कार टाकण्यात आलाय. मेट्रो भूमिपुजनाचा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आला आहे. महापौरांनी मेट्रोचे उदघाटन 23 डिसेंबर शरद पवार यांच्या हस्ते करण्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कामगार पुतळा येथे सकाळी ११ वाजता भूमिपुजनाचा कार्यक्रम आयोजनाचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी पालिका प्रशासनाला दिलेत. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या सर्व नेतेमंडळींना एकाच व्यासपीठावर स्थान दिले जाईल. तसेच मेट्रो प्रकल्प हा पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांचा संयुक्त प्रकल्प आहे, त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांशीही या कार्यक्रमाबाबत विश्वासात घेण्यात येणार आहे, असे महापौर जगताप म्हणाले.
दमरम्यान, पुण्याच्या महापौरांनी मेट्रोचे उदघाटन 23 डिसेंबर शरद पवार यांच्या हस्ते करण्याची घोषणा केली याची मला माहिती नाही, पण भाजपा यामध्ये राजकारण करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आणि अप्रत्यक्षपणे पुण्याच्या महापौरांना पाठिंबा दर्शवला. सरकारने स्थानिक सत्ताधारी आणि पार्ट्यांना सामावून विकास कामाचे उदघाटन करणं गरजेचं असतं असं ही मत पवार यांनी व्यक्त केलं. ते पिंपरी चिंचवड मधील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार यांनी या वेळी भाजप शहराध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या लक्ष्मी वक्तव्यावर ही टीका केली. लोकांना खुश करण्याकरता केलेलं हे वक्तव्य अंगलट आल्यावर, त्या हेतूनं बोल्लोच नाही, असे म्हणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय. पण हे पूर्वी फक्त वर्तमानपत्र असताना चालायचं आता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कॅमेऱ्यात हे सर्व टिपलं जाते आहे. त्यामुळं जे बोलले ते टाळता येणार नाही असं पवार म्हणाले.