मुंबई : कोकणात गेले तीन दिवस पावसाचा जोर कायम आहे. आज मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेले तीन दिवस रत्नागिरीत चांगला पाऊस कोसळत आहे. काल खेड - दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प होती. खेडमधील चोरद, जगबुडी, नारंगी या नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. खेडमधील 32 गावांचा पुरामुळे शहराशी असणारा संपर्क तुलटा होता.


आज दुसऱ्या दिवशी मुंबई - गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली. परशुराम घाटात दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे घाटात दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर काल पुरामुळे चिपळूण येथे वाहतूक थांबविण्यात आली होती.


दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. आरवली आणि संगमेश्वर या दोन स्टेशन दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली आहे. काही काही गाड्या रत्नागिरी स्थानकात रोखून धरण्यात आल्या आहेत. तसेच चिपळूण, वीर, कोलाड, दिवाणखवटी येथेही गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रस्ता आणि रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले आहेत.