शिर्डी : शंभरी पार केलेल्या आणि साईबाबांच्या हयातीतच सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला आज पहाटेच्या काकड आरती पासून सुरूवात झाली आहे. तीन दिवस चालणा-या या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक पायी पालख्यांच्या माध्यमातून शिर्डीत दाखल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डीकरांनीही भरगच्च सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रामनवमी उत्सवाचा आज पहिला दिवस आहे. साईमंदीरात काकड आरतीनंतर साईंची प्रतिमा आणि पोथीच्या मिरवणुकीने उत्सवाला आरंभ झाला आहे. सायंकाळी गावातून साईंची पालखी मिरवणूक निघेल.


उद्या रामनवमीच्या मुख्य दिवशी पहाटेच्या  प्रतिमेच्या मिरवणुकीनंतर कावडीची मिरवणूक निघणार आहे. दुपारी रामजन्माचा उत्सव साजरा होईल. त्याच बरोबरीने हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले निशाण द्वारकामाईवर चढवण्यात येईल. मंदिर परिसर आणि भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणी मंडप उभारण्यात आले आहेत. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या द्वारकामाई मंडळाने परिसरात आकर्षक देखावा उभारला आहे.