मुख्यमंत्री समुद्र सोडून डबक्यात बघतात - राणेंचा घणाघात
महाराष्ट्रातील ८ कोटीं मतदारांपैकी केवळ ५० लाख मतदारांच्या निवडणुकांचे निकाल काल लागले आहेत आणि मुख्यमंत्री पेढे काय भरवतात, नंबर १ काय म्हणतात, ५० लाखात ? समुद्र सोडून डबक्यात बघतात, अशी खास आपल्या शैलीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या यशाच्या सेलिब्रेशनवर टीका केली.
पुणे : महाराष्ट्रातील ८ कोटीं मतदारांपैकी केवळ ५० लाख मतदारांच्या निवडणुकांचे निकाल काल लागले आहेत आणि मुख्यमंत्री पेढे काय भरवतात, नंबर १ काय म्हणतात, ५० लाखात ? समुद्र सोडून डबक्यात बघतात, अशी खास आपल्या शैलीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या यशाच्या सेलिब्रेशनवर टीका केली.
नोटाबंदीचा फायदा भाजप आणि त्यांच्या राज्य सरकारांनी करून घेतला. नोटा बदली करणारे भाजपवालेच आहेत, असाही आरोप राणे यांनी यावेळी केला.
हे सरकार काहीच काम करत नाही, सुरु असलेली चांगली कामे त्यांनी थांबवलीत, वृत्तपत्रे ज्या बातम्या देतात त्यांवर जाऊ नका, ते वास्तव सांगत नाहीत. देशात बेबंदशाही सुरु आहे, त्यांना वाटेल ते करतात. मोदींना प्रगती करता येत नाही, नको ते करतात, अशीही टीका राणे यांनी मोदींवर केली.
नेत्याने नेत्यासारखं वागावं, आमचे नेते सांभाळून बोलतात, मागे राहतात, नेता म्हटलं की जनता आपल्यावर विश्वास ठेवत असते, आपण त्यांच्यासाठी लढलं पाहिजे. कोणत्याही विषयावर बोलायला आमचे लोक राखून राखून बोलतात, मला नाही जमत ते, असे म्हणत स्वपक्षीय काँग्रेसजनांना घरचा आहेर दिला.
या देशातील लोकांचं जगणं हराम झालं, लोक का भाजपला मतदान करतात करतात कळत नाही, पैसे वाटून मतं विकत घेतली आहे. युती सरकारचे एक काम कळवा, लाखाचं बक्षिस मिळवा, अशी ऑफरही राणेंनी यावेळी दिल्याने लोकांची दाद घेतली.
सीमेवर काय चाललंय ? आमचे सैनिक मरताहेत, काहीतरी कराना..काँग्रेसने कितीतरी सर्जिकल स्ट्राईक्स केले, तुमच्यासारखी प्रसिद्धी नाही मिळवली, असेही राणेंनी सर्जिकल स्ट्राइकवर घणाघात केला.
मराठ्यांचे मोर्चे किती मोठे निघाले तरी आम्हालाच विजय मिळाला असं विरोधक सांगताहेत, भाजपचे लोक मराठ्यांचा अपमान करताहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.