महाड दुर्घटनेची शोध मोहीम थांबवली
महाडमधली सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यामुळे झालेल्या दुर्घटनेची शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.
महाड : महाडमधली सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यामुळे झालेल्या दुर्घटनेची शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. या दुर्घटनेमध्ये वाहून गेलेल्या दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडी सापडल्यानंतर हे शोध कार्य थांबवण्यात आलं.
राजापूर-मुंबई एसटीचा सांगाडा गुरुवारी नौदलाच्या पथकाला सापडला तर शनिवारी जयगड-मुंबई या एसटीचाही सांगाडा सापडला. यानंतर आज बेपत्ता टवेरा गाडीचा शोध घेण्यात नौदलाच्या जवानांना यश आलं. या गाडीमध्येही दोन मृतदेह सापडले आहेत.
या तीन वाहनांमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. नौदल, आणि एनडीआरएफनं युद्धपातळीवर बचाव आणि शोधमोहीम सुरु केली होती. दुर्दैवानं यात एकही जिवंत प्रवासी सापडला नाही. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी 28 मृतदेह सापडले असून 12 जण अजूनही बेपत्ता आहेत.