मुंबई : पाच दिवसांपासून संपावर असलेले निवासी डॉक्टरर्स आज सकाळी कामावर रूजू झालेत. मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला आता 24 तास पोलिसांचा पहारा देण्य़ात आला आहे. बंदूकधारी पोलीस रुग्णालयात तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दर दोन तासांनी बीट मार्शलही रुग्णालयांना भेट देणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरातल्या सरकारनी वैद्यकीय महाविद्यालयातही सरकारनं सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरक्षा वाढवणार असल्याच मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं. पंधरा दिवसात बदल झाला नाही, तर राजीनामा देऊ असंही महाजनांनी झी 24 तासच्या कार्यक्रमात म्हटलं. त्यानुसार आज नागपूरात सुरक्षा वाढल्याचं दिसतं आहे.


पुण्यात ससून रुग्णालयात सामूहिक रजेवर गेलेले निवासी डॉक्टर कामावर रुजू झालेत. आज सकाळपासून कॅम्पसमध्ये डॉक्टरांची कामावर जाण्यासाठी लगबग दिसून आली.


शुक्रवारी मुंबई हायकोर्टानं संपकरी डॉक्टरांचे कान उपटले होते. कोर्टासमोर एक सांगता आणि बाहेर जाऊन भलतंच काही तरी सांगता हा काय प्रकार आहे असा सवाल करत कोर्टाने मार्डला चांगलंच धारेवर धरलं. कोर्टानं तुमच्या कामाचं कौतुक केलं ते सगळं मागे घ्यावं लागेल असं देखील कोर्टाने निवासी डॉक्टरांना सुनावलं. तुम्ही तुमच्या सदस्यांना कामावर रुजु व्हा हे मान्य करुन घेण्यात अपयशी ठरले आहात.  तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनाने घेण्याचे आदेशही दिले आहेत. अशा कारवाईला मार्डचा आक्षेप नसल्याचं प्रतिज्ञापत्र मार्डनं कोर्टाच्या आदेशानं सादर केलं.