COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे : कार चालवत असताना मोबाइलवर बोलत असल्याचं दिसल्यानंतर वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलने त्याची गाडी रोखली. मात्र, चुकीची माफी मागण्याऐवजी या वाहनचालकाने थेट त्या महिला कॉन्स्टेबलला भर चौकात चक्क मारहाण सुरू केली. तिच्या नाकातून रक्त ओघळू लागल्यानंतर एक वकील तिच्या मदतीसाठी धावला. त्यानंतर त्या वाहनचालकाची वरात पोलिस स्टेशनला पोहचली.


महिला पोलिसावर हात उचलणाऱ्या शिवसैनिकाचं नाव शशिकांत कालगुडे (44) असून तो शिवसेनेचा धर्मवीर नगरातील शाखाप्रमुख आहे. कालगुडेला पोलिसांनी अटक केली असून कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.


झालं असं की, गुरुवारी सकाळी नितीन कंपनी जंक्शन इथून कालगुडे आपल्या स्कॉर्पिओ गाडीने जात होता. गाडी चालवत असताना मोबाइलवर बोलणार्‍या शशिकांत याला नितीन कंपनी जंक्शन इथे ड्यूटीवर असलेल्या एका महिला वाहतूक पोलिसानं त्याला हटकलं. त्यामुळे सिग्नलवर वाहनांचा खोळंबा होत असल्याचं शशिकांतच्या निदर्शनास आणून देताच रागाचा पारा चढल्यानं त्याने गाडीतून उतरत चक्क पोलीस महिलेला भर चौकात शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.


दरम्यान, महिला पोलिस शिपायाच्या नाकातोंडातून रक्तस्राव होत असतानाही तिने धीर एकवटत आरोपी शशिकांत विरोधात पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. नौपाडा पोलिसांनीही तात्काळ कारवाईचा बडगा उगारत आरोपी शशिकांतच्या गुन्हा नोंदवला. कोर्टाने आरोपी शशिकांतला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.