शहीद राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव पुण्यात होणार दाखल
पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात गेल्या १३ वर्षापासून देशाची सेवा बजावणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुपूत्र राजेंद्र नारायण तुपारे धारातीर्थी पडले.
कोल्हापूर : पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात गेल्या १३ वर्षापासून देशाची सेवा बजावणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुपूत्र राजेंद्र नारायण तुपारे धारातीर्थी पडले.
राजेंद्र तुपारे हे २२ मराठा इन्फंट्री युनिटचे जवान होते. शहीद राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव श्रीनगर येथून दुपारनंतर पुणे येथे आणलं जाणार आहे. त्यानंतर गावाकड़े येण्याची शक्यता आहे.
राजेंद्र यांच्या मागे पत्नी, ९ आणि ५ वर्षांची दोन मुलं, आई-वडील आणि २ भाऊ १ बहिण असा परिवार आहे. १३ वर्षांपूर्वी राजेंद्र सैन्यात भरती झाले होते.
राजेंद्र हे मूळचे चंदगड तालुक्यातील कार्वे या गावचे सुपूत्र आहेत. राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई-वडील आणि दोन भाऊ एक बहिण असा परिवार आहे. आर्यन आणि वैभव अशी त्यांच्या दोन्ही मुलांची नावं असून ते ९ आणि ५ वर्षाची आहेत.
राजेंद्र तुपारे शहीद झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. राजेंद्र हे १३ वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते. एका सदन घरातील असूनदेखील राजेंद्र यांनी बारावीनंतर सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.
राजू या नावानंच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत त्यांची ओळख होती. राजेंद्र यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्याचा वारसा आहे. त्यामुळं गावातील एक प्रतिष्ठेचं घर म्हणून तुपारेंच्या घराकडे पाहिलं जातंय.
सामाजिक कार्यात असो किंवा खेळामध्ये राजेंद्र हे सर्वात पुढे असायचे. मात्र, आज राजेंद्र शहीद झाल्याची बातमी समजताच पूर्ण गाव शोकसागरात बुडालं.