विकास भोसले, झी मीडिया, भिलार, सातारा : महाबळेश्वरजवळील 'भिलार'ची जगाच्या नकाशावर भारतातील पहिले 'पुस्तकाचे गाव' म्हणून नवी ओळख निर्माण झालीय. जगाच्या पाठीवरील मराठी भाषेच्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भिलारमध्ये एक बडी असामी पर्यटक म्हणून दाखल झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या राजकारणातलं व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपल्या साहित्याच्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहेत. राज्याच्या साहित्य व्यवहारात पवारांचं योगदान वादातीत आहे. पवार आणि साहित्यिकांचे किस्सेही प्रसिद्ध आहेत... त्याचा प्रत्यय भिलारवासियांनाही आला. भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून नावारुपाला येत असलेल्या भिलारमध्ये पवारांनी कुटुंबियांसमवेत भेट दिली.



पुस्तकांवर मनापासून प्रेम करणाऱ्या पवारांच्या चेहऱ्यावर या विशेष गावात आल्याचा आनंद लपत नव्हता... घराघरा सजलेल्या दिवाणखान्यांमध्ये पुस्तकं बघून, पवारांना ती चाळण्याचा मोह आवरला नाही... पवारांसोबत त्यांचे कुटुंबियही होते... दौरा खाजगी आणि कौटुंबिक होता... त्यामुळे मोजक्याच कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. भिलारच्या सरपंच वंदना भिलारे, माजी आमदार भिलारे गुरुजी यांच्या दिवाणखान्यातली पुस्तकं पवारांनी चाळली... गावची संकल्पनाही समजून घेतली. 


पवार आले आणि राजकारणाच्या गप्पा झाल्या नाहीत, असं होणं केवळ अशक्य... अर्थात भिलारमध्येही ते घडलचं... पण पवारांचा मूड यावेळी हलका-फुलका होता... त्यामुळेच की काय हिलरेंज शाळेत कार्यकर्त्यांशी बोलताना एकच हशा पिकला... छोट्याशा भेटीत पवारांनी जो आनंद अनुभवला... तोच आनंद प्रत्येक पुस्तक प्रेमी या गावात जाऊन अनुभवेल असं म्हणालाय हरकत नाही...