कपिल राऊत, ठाणे :  प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रासह त्यांच्या 3 पार्टनर्सच्या विरोधात 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात 26 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने सिनेजगतासह उद्योग क्षेत्रातही शेट्टी दांपत्यांच्या विरोधात चर्चेला उधाण आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपहाराचा शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली आदी पाच पार्टनर्सच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या पाचही पार्टनर्सना पोलीस निरीक्षक व्ही.के.देशमुख यांनी नोटीस बजावून पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी फर्मान काढले होते.


मात्र अटक टाळण्यासाठी या सर्वांनी तत्काळ ठाणे जिल्हासत्र न्यायालयात धाव घेवून अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयाला विनंती केली होती. त्यानुसार न्यायाधीश खलिके यांनी 17 मे पर्यंत या पंचकुटीला अटक करू नये असे आदेश पारित करून न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर तात्पुरता आधार दिला आहे. मात्र ठाणे न्यायालयाने जामीन रद्द केल्यास या सर्वांच्या अटकेवर टांगती तलवार असल्याने शेट्टी दांपत्याची धाकधूक कायम आहे.


यावेळी राज कुंद्रा यांच्या सुरक्षेसाठी 10 बाऊंसर तर कायदेशीर बाजू मांडण्यासाठी चार वकिलांची फौज सोबत आली होती. कोनगांव पोलिसांनी राज कुंद्रासह त्याच्या पार्टनर्सची वातानुकूलित रूममध्ये दोन तास कसून चौकशी केली. 


सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी व उद्योगपती राज कुंद्रा या दांपत्याने बेस्ट डील कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात देशभरातील अनेक व्यापाऱ्यांना फसवले असून त्यांनी आजपावेतो सुमारे 18 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व प्रकार लवकरच पोलिसांमार्फत उघड होणार असल्याचे तक्रारदार रवि भालोटिया यांचे म्हणणे आहे.