सोलापूर : नोटबंदीनंतर जुन्या पाचशे, हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी, सर्वच बँकांसमोर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर शिवसेनेनं बँकापुढे रांगेत उभ्या असलेल्या खातेदारांना, चक्क झंडू बामचं वाटप केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तासनतास रांगेत उभं राहून लोकांचे हातपाय आणि कंबर दुखत आहे. त्‍यावर इलाज म्‍हणून आपण हे झंडू बाम वाटप केल्याचं, शिवसेनेचे सोलापूर शहरप्रमुख प्रताप चव्हाण आणि इतर पदाधिका-यांनी सांगितलं. 


बुधवारी नोटरद्दतेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींना साथ दिली. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिका-यांच्या झंडू बाम वाटप कार्यक्रमामुळे, नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली शिवसेनेकडून उडवली जात असल्याची चर्चा रंगली आहे. परिणामी शिवसेनेचा हा झंडू बाम उतारा भाजपला चांगलाच झोंबण्‍याची शक्‍यता आहे.