पुणे : पुण्यात होऊ घातलेल्या सनबर्न पार्टीला विरोध आता तीव्र होऊ लागलाय. वारकरी संप्रदाय, सनातन संस्था आणि शिवसेनाही आता सनबर्न विरोधात मैदानात उतरली आहे. तर सरकारने सनबर्नबाबत बोटचेपी भूमिका घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात सध्या वादाचा विषय ठरलेल्या सनबर्न पार्टीवर सरकार बोटचेपी भूमिका घेत असल्याचंच गिरीश बापट यांच्या वक्तव्यातून दिसंत आहे. गोव्यात सलग नऊ वर्ष होत असलेला नववर्ष स्वागताचा धिंगाणा म्हणजे सनबर्न पार्टी यावर्षी पुण्यात होत आहे. सनबर्नमध्ये मद्यपान, अंमली पदार्थांचं सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप व्हायला लागलाय. तरीही भाजप सरकारचे मंत्री मात्र एकीकडे विरोध असल्याचं सांगतात. पण नियमांच्या आडून परवानग्या देण्याचाही घाट घालत आहेत. 


सनबर्न पार्टी वनविभागाच्या जागेवर होऊ देणार नाही असं वनमंत्री म्हणत आहेत. पण सनबर्न पार्टी होत असलेली जागा पुण्यातल्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकाची आहे. सनबर्न पार्टीच्या जागेवर जाण्यासाठी होत असलेला रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जातो. पण पार्टी आयोजकांवर कारवाईऐवजी वनविभागाने केवळ काँट्रॅक्टरवर गुन्हा दाखल केलाय. मात्र गुन्हा दाखल होऊनही रस्त्याचं काम सुरूच आहे. याचाच अर्थ कारवाईचा केवळ देखावा निर्माण करण्यात आलाय. पुण्यात होऊ घातलेल्या सनबर्न पार्टीच्या विरोधात आता वारकरी संप्रदाय उभा राहिलाय. संस्कृतीची अवहेलना करणाऱ्यांविरोधात संपूर्ण शक्तीनिशी आंदोलन करू असा स्पष्ट इशारा वारकरी संप्रदायाच्या पुणे जिल्हा संघटनेनं दिला आहे. 


वरवर पाहता वाटते की, ‘सनबर्न’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम आहे; पण त्याच्या मुळाशी जाऊन परिणाम पाहिले, तर लक्षात येते की, अमली पदार्थांचा बाजार वाढवण्यासाठी युवकांना गाण्यावर थिरकण्याच्या बहाण्याने त्यांना बोलावले जात आहे. वारकरी संप्रदाय संपूर्ण शक्तीनिशी या महोत्सवाच्या विरोधात उभा आहे. 


सनबर्न फेस्टिव्हलमध्ये ८० हजारांची तिकिटं खरेदी करणाऱ्यांची चौकशी का होऊ नये असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थित केला आहे. पुण्यातल्या सनबर्न पार्टीला स्थानिक पातळीवर विरोध वाढात असताना सरकारची भूमिका मात्र खरोखर संशयास्पदच आहे. त्यामुळेच की काय पण पार्टीची तयारी जय्यत सुरू आहे. याचाच अर्थ कितीही विरोध झाला तरी पार्टी सुरळीत होणार हा विश्वास आयोजकांना सरकारच्या बोटचेप्या भूमिकेतूनच मिळाला का या संशयाला नक्की जागा आहे.