सिंधुताई सपकाळ संतप्त, आणखी किती प्रवाशांचे जीव घेणार?
सिंधुताई सपकाळांनी एक्सप्रेस हायवेवरच्या बेदरकार वाहनचालकांविरोधात आवाज बुलंद केला.
पुणे : बुधवारी मध्यरात्री मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर जे घडलं, त्यानं सरकारचे डोळे उघडतील, अशी आशा करायला हरकत नाही. साऱ्या महाराष्ट्रातल्या अनाथांची आई म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुताई सपकाळांनी एक्सप्रेस हायवेवरच्या बेदरकार वाहनचालकांविरोधात आवाज बुलंद केला.
बुधवार रात्री 12.30 वाजता सिंधुताईंनी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरच्या तळेगाव टोल नाक्यावर ट्राफ़िक थांबवून irb च्या कर्मचारी आणि अधिकारी यांना जाब विचारला. त्या मुंबईहून पुण्याला येत होत्या. बेदररकार वाहने चालवणारे ट्रक, मोठी वाहने यामुळे प्रवास असुरक्षित झाल्यामुळे त्या संतप्त झाल्या होत्या.
10 दिवसांत जर या बेशिस्त ट्रकचालकांचा बंदोबस्त नाही केला तर इथे आंदोलन करीन असा इशारा त्यांनी irb च्या कर्मचार्याना आणि सरकारला दिला. सिंधुताईंनी विचारलेल्या संतप्त प्रश्नामुळे आयआरबीचे अधिकारी निरुत्तर झाले.
घटनेच्या वेळी विनोद सातव नामक प्रवासी तळेगावच्या टोल नाक्यावर होते. त्यांनी हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद केला. सिंधुताईंना शांत करून त्यांना गाडीत बसण्यास सांगितल. अखेर सिंधुताईंनी सातव यांच्या विनंतीला मान देऊन गाडी बाजूला केली आणि वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाली.