मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीसाठी गाडी भाड्याने मिळते. ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. नाशिकचे सोनसाखळी चोर विना नंबर प्लेटची नवी कोरी गाडी घेऊन येतात, महिलांच्या गळ्यातली सोनसाखळी ओरबाडतात आणि पोबारा करतात. बर हे चोरही साध्यासुध्या घरात राहात नाहीत तर तीन मजली हवेलीत या चोरांचा म्होरक्या राहतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या सोनसाखळी चोरांची ही वरात निघाली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यापासून नाशिकच्या पेठरोडवरील अश्वमेधनगरमधल्या या तीन मजली इमारतीपर्यंत वरातीचा हा मार्ग होता. ही तीन मजली इमारत आहे चक्क सोनसाखळी चोरांच्या म्होरक्याची. किरण सोनावणे हा अट्टल सोनसाखळी चोर.


 विलास मिरजकर या आपल्या साथीदाराच्या मदतीने भाडेतत्वावर नवी कोरी गाडी घेऊन सोनसाखळी चोरीची शक्कल याने लढवली. एजंटला हाताशी धरून शो रूममधून गाडी बाहेर घेऊन येणाऱ्या कारमालकाला हेरायचं. हजार दीड हजार रूपये मोजायचे आणि सोनसाखळी चोऱ्या करायच्या अशी त्यांची कार्यशैली होती. 


नाशिकच्या अमृतधाम परिसरात मात्र सोनसाखळी चोरताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. चोरटे गाडी तिथेच सोडून पळाले. गाडीच्या चॅसी नंबरवरून पोलीस मालकापर्यंत पोहोचले आणि चोरटे पोलिसांच्या हाती लागले. 


पोलिसांनी दोन सोनसाखळी चोरांसह त्यांना गाडी पुरवणाऱ्या सागर खरे या तिसऱ्या संशयितालाही अटक केलीय. या तिघांची चौकशी केली जात आहे. 


नाशिकचचे चोर हे पोलिसांच्या एक पाऊल पुढे जाऊन आपले मनसूबे साध्य करतात. चोरट्यांच्या गाडीला अपघात झाला नसता तर कदाचीत ही शक्कल उघड झाली नसती. त्यामुळे नागरिकांनीही सजग राहून पोलिसांना मदत करण्याची गरज आहे. तसंच चोर अशा कोणकोणत्या पद्धतीने चोऱ्या करू शकतात याचाही पोलिसांनी अभ्यास करणं गरजेचं आहे.