नाशिक : मालेगावचा मयूर वाघ ऐन दहावी परीक्षेच्या पाच-सहा दिवस आधी अपघात होवून जखमी झाला. आता परीक्षेला मुकावं लागणार अशी स्थिती होती. पण मयूरची इच्छाशक्ती आणि नाशिक शिक्षण मंडळानं दिलेल्या परवानगीनं त्यानं आज पहिला पेपर दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगावच्या बालाजी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये बसून मयूर वाघने परीक्षा दिली. १ मार्चला बाईकवरुन जाताना त्याचा अपघात झाला आणि उजव्या मांडीचं हाड मोडलं. त्यामुळे त्याला दहावीच्या परीक्षेला मुकावं लागणार होतं. मात्र त्यानं परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली. 


काय करावं असा प्रश्न त्याच्या पालकांना सतावत होता. त्यातूनच मयूरच्या पालकांनी थेट नाशिकचं विभागीय कार्यालय गाठलं आणि आपल्या मुलाला हॉस्पिटलमधूनच परीक्षा देण्याचा विनंती अर्ज केला. अधिका-यांनीही वैद्यकीय अहवालाची खातरजमा करत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेवून काही अटींवर मयूरला हॉस्पिटलमधूनच परीक्षा देण्याची परवानगी दिली. 


शिक्षण मंडळानं प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली. या परीक्षेसाठी एक इमारत निरीक्षक, एक पर्यवेक्षक आणि पोलीस तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणं शिक्षण मंडळाचे अधिकारीही लक्ष ठेवून होते. जखमी अवस्थेतही मयूरनं हॉस्पिटलमधून परीक्षा दिली. त्यातून त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून येते.