विवाहीत प्रेयसीला लग्नाची मागणी, नकार दिल्याने कारमध्येच पेटवून घेतले
सोलापूर रस्त्यावर हडपसर इथल्या गाडीतळ चौकात मारुती व्हॅनला लागलेल्या आगीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेयसीनं दुस-या तरुणासोबत लग्न केल्यामुळं माहि इंगळे या तरुणानं तिच्या घरासमोरच स्वताला कारमध्ये कोंडून जाळून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुणे : सोलापूर रस्त्यावर हडपसर इथल्या गाडीतळ चौकात मारुती व्हॅनला लागलेल्या आगीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेयसीनं दुस-या तरुणासोबत लग्न केल्यामुळं माहि इंगळे या तरुणानं तिच्या घरासमोरच स्वताला कारमध्ये कोंडून जाळून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
माहीचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही तरुणी हडपसर सासवड रस्त्यावरच्या ग्लायडींग सेंटरसमोर रहात होती. माहिनं तिच्या घरच्यांना लग्नाबाबत विचारणाही केली होती. मात्र तिच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर या तरुणीचं दुस-या मुलासोबत लग्न झालं. लग्नानंतरही माही तिच्या मागावर होता. तिच्याकडे लग्नाची मागणी करत होता शिवाय लग्न न केल्यास घरासमोर आत्महत्या करु अशी धमकीही माहिनं त्या तरुणीला दिली होती.
गुढी पाडव्याच्या दिवशी ही तरुणी माहेरी आली असता माही इंगळे फलटणहून मोटार घेऊन पुण्यात दाखल झाला आणि तरुणीच्या घराच्या बाजूला गाडी उभी करुन त्यानं गाडीतच स्वत:ला पेटवून घेतलं. गाडीतून मोठ्या प्रमाणात धूर येवू लागल्यानंतर नागरीकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वा-यामुळे आग आणखीन भडकली. यात माहि इंगळेचा होरपळून मृत्यू झाला.