आई उच्चशिक्षित, वडील प्राध्यापक तरीही...हा प्रसंग वाचताना अंगावर काटा
सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या ७ वर्षांच्या मुलीसह महिलेनं विहिरीत उडी घेतली.
औरंगाबाद : एका कॉलेज तरुणीच्या आत्महत्येनंतर आजही एका विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली. या सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या ७ वर्षांच्या मुलीसह महिलेनं विहिरीत उडी घेतली.
घरात लांच्छनास्पद प्रकार
मुलगी वाचली, मात्र महिलेचा बुडून मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे उच्चशिक्षित घरात हा लांच्छनास्पद प्रकार घडलाय. अवघ्या ७ वर्षांच्या जिगिशाच्या तोंडून हा प्रसंग ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
तिनं जीवन संपवायचं ठरवलं
आई उच्चशिक्षित. वडील प्राध्यापक. तरीही जिगिशाची आई रसिकाला सासरच्या मंडळींकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळत होती. याला कंटाळून तिनं जीवन संपवायचं ठरवलं. पण आपल्यामागे मुलीचं काय, या चिंतेत तिनं जिगिशासह विहिरीत उडी घेतली. यात रसिकाचा अंत झाला.
अन् ती चिमुकली वाचली
जिगिशाच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणूनच की काय, विहिरीतील वायर चिमुकलीच्या हाती लागली अन् ती वाचली. औरंगाबादच्या सातारा परिसरात पृथ्वीनगरमधली ही धक्कादायक घटना. पेपर टाकणाऱ्या परशुराम गायके यांनी जिगिशाचा आवाज ऐकला आणि हा प्रकार उघड झाला.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत
रसिकाचा पती कालिदास करमाडच्या राजीव गांधी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. रसिका स्वतः जलसंधारण विभागात कामाला होती. ८ वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतरच्या वर्षभरातचं कालिदास रसिकाला सातत्यानं तुच्छतेनं वागवत असल्याची माहिती पुढे आली. रसिकानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या छळाचा पाढाच वाचलाय. रसिकाच्या भवानं दिलेल्या तक्रारीवरून कालिदासला अटक करण्यात आली आहे.
कुटुंब उच्चशिक्षित असलं, तरीही महिलांना समान वागणूक दिली जात नसल्याचंच या घटनेनं अधोरेखित केले आहे. केवळ शिक्षण उपयोगाचं नाही, तर त्याबरोबर संस्कारही आवश्यक आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.