विरार : वसई विरार महापालिकेच्या कर्मचा-यांनी तालिबानी पद्धतीनं थकबाकी वसुली सुरू केलीय. एका 70 वर्षांच्या वृद्ध आजींना महापालिका कर्मचाऱ्यांनी चक्क कोंडून ठेवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहिणी भालचंद्र क्षीरसागर या 70 वर्षांच्या आजी गोरेगावला आपल्या मुलाकडं त्या राहतात, पण नुकतंच त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालं. आराम करण्यासाठी म्हणून आपल्या मुलीकडं म्हणजे अनघा पोवळेंच्या नालासोपा-यातल्या गौरव गार्डन इमारतीतल्या घरी राहायला आल्या.


सोमवारी सकाळी साडेदहा वाजता रोहिणी आजी मुलीच्या घरात एकट्याच होत्या, त्यावेळी महापालिकेचे ठेका पद्धतीनं काम करणारे तीन कर्मचारी आले. त्यांनी सहाय्यक आयुक्त प्रकाश जाधव यांनी काढलेली जप्तीची नोटीस घराबाहेर चिकटवली आणि घराला चक्क बाहेरून सील ठोकलं.


तब्बल तीन-साडेतीन तास रोहिणी आजींना मुलीच्या घरात डांबून ठेवण्यात आलं. महापालिकेनं ज्या थकबाकी वसुलीसाठी ही एवढी कडक कारवाई केली, ती थकबाकीची रक्कम होती केवळ ७ हजार ६७५ रूपयांची.


पालिका कर्मचा-यांनी 20 जानेवारीला त्याबाबतची नोटीस दिली आणि अवघ्या तीन दिवसात ७ हजार ६७५ रूपयांच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई केली. महापालिकेच्या या तालिबानी कारभारावर आता जोरदार टीका होत आहे.


वृद्ध महिलेला कोंडून, घर सील करणा-या पालिका कर्मचा-यांची चूक महापालिका आयुक्तांनी मान्य केलीय. मात्र कॅमे-यासमोर बोलण्यास ते तयार नाहीत. एकीकडं लाखो रूपयांची थकबाकी असणा-यांवर आणि बेकायदा बांधकामं करणा-यांवर वसई विरार महापालिका काहीच कारवाई करत नाही. पण सामान्य माणसांना मात्र किरकोळ रकमेसाठी कसं छळलं जातं, हेच यावरून दिसून येतं आहे.