मुंबई : येत्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात मात्र पारा 46.2 अंशावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची काल नोंद झालीय. नागपूरचा पारा 46.2 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलाय. अशीच उष्णतेची लाट काही दिवस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलीय. त्यामुळं नागपूरकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 


राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली असली तरी उन्हाची काहिली कायम आहे. त्यात नागपुरात विक्रमी तापमानाची नोंद झाल्यामुळं नागपूरच्या उकाड्यात आणखीनच भर पडलीय. 


पुढच्या दोन दिवसांत राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय. या आठवड्यात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात उन्हाचा पारा सरासरी इतकाच राहील. 


मात्र विदर्भात पारा 46.2 अंश सेल्सिअसवर कायम राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. मान्सूनचं अंदमानात आगमन झालेलं असून पुढील ४८ तासात तो पुढं सरकणार असल्याचा अंदाज आहे. सर्वसाधारण भारतात मान्सून ३१ मे दरम्यान येतो, अंदमान येथे मान्सून नियोजित तारखेच्या. दोन तीन दिवस आधीच आल्यानं त्याचा प्रवास आधीच्या गतीने होतो का याकडे लक्ष लागलंय. 


दरम्यान, कणकवली, मालवण परिसरात तब्बल पाच-सहा तास मुसळधार पाऊस झाला. झाडं उन्मळून पडण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, उन्हाच्या काहिलीनं त्रस्त झालेल्या नागरिकांना त्यामुळं काहीसा दिलासा मिळाला असला तरी आंब्याचं मात्र नुकसान होणार आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस उकाड्यात वाढ झाली होती. कालचा दिवस वातावरण ढगाळ होते. दरम्यान, कोकणातील शेतात सध्या भाजवळीची कामं आटपण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू आहे.