लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांचा आज निकाल
सोमवारी पार पडलेल्या लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणूकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. आज सकाळी 10 वाजता तिन्ही शहरात मतमोजणीला सुरूवात होईल.
LIVE पाहा : नगरपालिका निवडणूक निकाल २०१७
मुंबई : सोमवारी पार पडलेल्या लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणूकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. आज सकाळी 10 वाजता तिन्ही शहरात मतमोजणीला सुरूवात होईल.
या तिन्ही महापालिकांची स्थापना झाल्यापासूनची ही दुसरीच निवडणूक आहे. लातूरमध्ये गेली अनेक वर्ष काँग्रेसचीच सत्ता आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत विलासराव देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या या बालेकिल्ला भाजपनं पुन्हा एकदा हादरा दिलाय.
त्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेत सत्ताही भाजपकडे जातेय याकडे सा-या राज्याचं लक्ष आहे. तिकडे चंद्रपुरात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. दोघांनीही भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. पण जनता प्रत्यक्षात काय कौल देते हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
परभरणीत सर्वच पक्ष स्वबळावर लढलेत. राज्य आणि केंद्रात जसं सत्तांतर झालं तसंच सत्तांतर परभणीकर महापालिकेतही करतील, अशी शिवसेना आणि भाजपला आशा आहे. सोमवारी झालेल्या मतदानाच्या वेळी उन्हाचा कडाक तीव्र असतानाही परभणीकरांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिलाय. त्यामुळे आता मावळते सत्ताधारी पुन्हा सत्तेत येतात, की विरोधीपक्ष महापौरपद खेचून घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.