देहूमध्ये उत्साहात पार पडला तुकारामबीज सोहळा
विठ्ठलाच्या पायीं थरारली वीट
उठला हुंदका देहूच्या वा-यात ।
अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव
निघाला वैष्णव वैकुंठासी ।।
देहू : तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केलं आणि भागवत संप्रदायाचा कळस काळाच्या पडद्याआड गेला. हाच तो दिवस... तुकोबांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या देहूनगरीमध्ये ३६७ वा तुकारामबीज सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.
सुमारे दोन लाख भक्तगण या सोहळ्यासाठी जमले. टाळ, मृदंग आणि वीणेच्या गजरानं परिसर दुमदुमून गेलं. पहाटे पासूनच पांडूरंगांच्या मुख्य मंदिरात आणि तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या. पहाटे तीन वाजता काकड आरतीनं सोहळ्याची सुरूवात झाली. चार वाजता विठ्ठल-रुक्मिणीची आणि शिळामंदिरात तुकोबांची महापूजा करण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास पालखीचा देखणा सोहळा सुरू झाला.
टाळकरी, सनई-चौघडे, शिंगवाले, ताशे, नगारे, आब्दागिरी, चौरा, गरूडटक्के, जरीपटके असा मोठा लवाजमा या पालखीत होता. तुकाराम मंदिरातून पालखी वैकुंठगमन मंदिराकडे मार्गस्थ झाली. दुपारी बारा वाजता 'पुंडलिका वरदा हरि विठ्ठल'च्या गजरात नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तुकाराम महाराजांना वैकुंठाला नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू गरुड घेऊन देहूला आले आणि त्यांना सदेह वैकुंठाला नेलं, अशी अख्यायिका आहे.
गरुड परत जात असतांना त्याचा पाय या नांदुरकीच्या झाडाला लागला अशी आख्यायिका आहे. सोहळयाच्या दिवशी दुपारी बारा वाजता या झाडाची फांदी हलताना भाविकांना दिसते, असही मानलं जातं. त्याचं साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षाजवळ गर्दी केली.
राज्यावर कोसळलेलं दुष्काळाचं संकट टळू दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, यासाठी भाविकांनी विठुराया आणि जगद्गुरुंना साकडं घातलं.
साडेतीनशे वर्षांपेक्षा मोठी परंपरा असलेला हा सोहळा. मात्र याचा उत्साह गुंजभरही कमी झालेला नाही.