पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंनी पीएमपीएलच्या कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. उशीरा येणाऱ्या पीएमपीएलच्या १२० कर्मचा-यांचा पगार कापण्यात येणार आहे. कार्यभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी मुंढेंनी हा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबरोबरच तुकाराम मुंढे यांनी  PMPML च्या कार्यालयीन वेळेत बदल  केला आहे.  पूर्वी साडेदहा ते साडेपाच असलेली वेळ बदलून आता 9.45 ते 5.45 अशी करण्यात आली. कर्मचारी आणि अधिकारी पूर्वी ७ तास काम करायचे. आता त्यांची ड्युटी ८ तासांची असणार आहे. कर्मचाऱ्यांनी टी-शर्ट आणि जीन्स वापरू नये, अशी ताकीद देण्यात आली आहे.


या शिवाय अनेक महत्त्वाचे निर्णय तुकाराम मुंडे यांनी घेतले..


कोणत्याही कर्मचाऱ्याने इतर कार्यालयांत कामाशिवाय जाऊ नये. त्यात प्रामुख्याने चहा घेण्यासाठी इमारतीच्या बाहेर न जाता कॅन्टीनमध्येच जावे. धूम्रपान करता कामा नये. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.


पुणे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. त्यांची संख्या सद्यस्थितीला १२ लाख असून त्यातून दीड कोटी रुपये उत्पन्न मिळत असून ते दोन कोटींवर जाऊ शकते. त्यासाठी प्रत्येक आगारातून बस वेळेवर सोडल्या पाहिजेत.


गाड्या सोडण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज असून प्रवाशांबरोबर चांगल्या प्रकारे संवाद साधला पाहिजे. त्यामुळे प्रवाशांमध्ये चांगली भावना निर्माण होऊन ते दररोज बसने प्रवास करतील. थांब्यावरच गाडी थांबली पाहिजे. पुढे-मागे गाडी थांबवू नका. ज्येष्ठांना प्राधान्य देण्याची गरज आहे. भविष्यात उत्पन्न न वाढल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते.


गाड्यांच्या दुरुस्तीसाठी जे स्पेअर पार्ट लागतात, तितकीच खरेदी करा, अधिकची खरेदी करू नका. त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.