अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांसोबत अधिकारी झिंगाट!
वसई विरार महापालिकेचे मुख्य अभियंता स्वरुप खानोलकर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
वसई : वसई विरार महापालिकेचे मुख्य अभियंता स्वरुप खानोलकर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. स्वरुप खामोलकर यांच्या वाढिदवसनिमित्तानं दारु पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमधअये पालिकेचे अभियंते आणि कर्मचारी यांच्यासोबतच वसई विरारमधले बेकायदा बांधकाम व्यावसायिक आणि चाळ माफियाही सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे एका बेकायदा बांधकाम व्यावसायिकानेच या पार्टीचं आयोजन केल्याची माहिती मिळाली आहे. या पार्टीमध्ये विदेशी मद्य, डीजे, नाचगाणी आणि फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली.
स्वतः मुख्य अभियंता स्वरुप खानोलकर यांनी या पार्टीमध्ये हिंदी गाण्यांवर ताल धरला. या प्रकरणाची वसई विरारचे पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी गंभीर दखल घेत रविवारी सुट्टीच्या दिवशीच 12 अभियंते आणि कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केलीय.
वसईतल्या समुद्रकिनारी ही जंगी पार्टी झाल्याची माहिती मिळतेय. ज्या बिल्डरांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करायची त्याच बिल्डरांसोबत मुख्य अभियंते बेधुंद होऊन नाचले. यावरुन पालिका अभियंते आणि बेकायदा बांधकाम व्यावसायिक यांच्यातल्या जवळीक पु्न्हा एकदा दिसून आली आहे.